इंदिरानगरला भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: July 2, 2014 10:27 PM2014-07-02T22:27:11+5:302014-07-03T00:08:07+5:30
इंदिरानगरला भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
इंदिरानगर : शहराची सुरक्षितता व दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने करूनही याकडे बहुतांशी घरमालकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, भाडेकरूंची माहिती दडविणाऱ्या कमोदनगरमधील दोन घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
इंदिरानगर पोलिसांनी भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेनुसार कमोदनगर येथील प्रमोद बुधा पवार, उषा सुभाष नेहे या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत़ यापैकी पवार यांनी कमोदनगर येथील जलधारा सोसायटीत ठेवलेल्या भाडेकरूची, तर नेहे यांनी कमोद पार्क येथील भाडेकरूची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेली नसल्याने ही कारवाई करण्यात आली़ दरम्यान, ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़
सातपूरच्या शिवाजीनगर भागात दहशतवादी शेख लालबाबास काही वर्षांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती़ त्याच्याकडून आरडीएक्स, नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांच्या चित्रफिती आढळून आल्या होत्या़ शेख लालबाबा हा या परिसरात भाड्याने राहत होता़ या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले होते़ तसेच माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ (वार्ताहर)