इंदिरानगर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:55 PM2020-06-16T16:55:10+5:302020-06-16T16:55:30+5:30
एरवी गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांचा माग काढता-काढता नाकीनव येत होते; मात्र गुन्हेगार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरत होते.
नाशिक : पोलिसांच्या वतीने लॉकडाउन शिथिल होताच गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. ‘हिस्ट्रीशिटर’ सराईत गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांमध्ये हवे असलेल्या फरार गुन्हेगारांचाही शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्यास गुन्हे शोधपथकाने आता कंबर कसली आहे. या दहा दिवसांत पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघांच्या मुसक्या बांधल्या.
लॉकडाऊन काळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने आता लॉकडाऊन शिथिल होताच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी परिसरातील गुन्हेगारांविरूध्द शोधमोहीम राबविण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले आहे. एरवी गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांचा माग काढता-काढता नाकीनव येत होते; मात्र गुन्हेगार त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यास यशस्वी ठरत होते. लॉकडाऊनपुर्वी याच पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरांनी अक्षरक्ष: हैदोस घातला होता. लॉकडाऊनकाळातसुध्दा दोघा चेनस्नॅचरकडून भरदिवसा गुन्हा घडवून आणला गेला आणि पोलिसांना उघड आव्हान दिले गेले; मात्र बीटमार्शल जोडीच्या सतर्कतेमुळे ते दोघेही पोलिसांच्या हाती लागले. गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सतीश जगदाळे यांच्या पथकाने सराईत गुन्हेगारांविरु द्ध धडक मोहीम राबविण्यास सुरु वात केली आहे. यामध्ये वडाळागावातील सराईत गुन्हेगार समीर निजामुद्दीन शेख उर्फसोनू कट्टा, तडीपार शौकत सुपडू शहा, सराईत गुन्हेगार मन्ना उर्फगोविंदा भारत गांगुर्डे व जबरी चोरी करून पळून जाण्याचे प्रयत्न करणारे सराईत गुन्हेगार बुरहान शेख, साहील सय्यद, सलीम शेख, तैय्यब पठाण आदींना अटक करण्यात आली आहे.