साठ दिवसांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याला पुन्हा नवीन ‘इन्स्पेक्टर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:14 AM2021-09-03T04:14:53+5:302021-09-03T04:14:53+5:30
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याला नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच सायबर पोलीस ठाण्याचे श्रीपाद परोपकारी यांची नियुक्ती करण्यात ...
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याला नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच सायबर पोलीस ठाण्याचे श्रीपाद परोपकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र त्यांना येथे फार कालावधीसाठी कामकाज करण्याची संधी मिळणार नाही. कारण दोन महिन्यांनंतर परोपकारी यांना सहायक पोलीस आयुक्तपदी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आयुक्तालयाकडून इंदिरानगर पोलीस ठाण्याचा कारभार पुन्हा नव्या अधिकाऱ्यांच्या हातात सोपविला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत पोलीस ठाण्याचा कारभार हा विस्कळीत स्वरूपात चालण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इंदिरानगरसह वडाळागाव आणि थेट पाथर्डी गावापर्यंतचा सर्व परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. उच्चभ्रु वसाहतींपासून झाेपडपट्ट्यांपर्यंत संमिश्र हद्द असलेल्या या पोलीस ठाणेअंतर्गत मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. लहान-मोठ्या चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरीसारख्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यात दीर्घ कालावधीसाठी एक अधिकारी नियुक्त करणे अत्यावश्यक आहे. पोलीस ठाण्याच्या कारभाराची घडी त्यामुळे विस्कटली जाणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थाही राखली जाण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन अधिकारी आल्यानंतर पोलीस ठाण्याचा कारभार, हद्दीमधील संवेदनशील बाबींची माहिती घेणे, परिसराची ओळख, सामाजिक स्तरातील जागरूक नागरिकांसोबतचा संपर्क करण्यामध्येच सुमारे दोन महिन्यांचा कालावधी निघून जातो.