इंदिरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:57 PM2020-06-13T22:57:06+5:302020-06-13T22:59:07+5:30
याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारांनादेखील सर्दी, खोकला, तापाचा त्रास वाढल्याने त्यांना ६ जूनरोजी रजेवर पाठविण्यात आले.
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकला अर्जित रजेदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या रूग्णात कोरोना संशयित लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्या घशातील स्त्रावचा नमुना कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आला असता या रुग्णाचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागल्याने बंदोबस्तावर असलेल्या आयुक्तालयाच्या पोलिसांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपुर्वीत भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोनामुक्त होऊन परतले असताना आता पुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. तसेच याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारांनादेखील सर्दी, खोकला, तापाचा त्रास वाढल्याने त्यांना ६ जूनरोजी रजेवर पाठविण्यात आले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करून अर्जित रजेसाठी १० जूनरोजी अर्ज केल्याने त्यांना सोडण्यात आले. त्यांनाही अचानकपणे अशक्तपणा जाणवू लागला व श्वास घेण्यास अडथळा होऊ लागल्याने त्यांना शुक्रवारी (दि.१२) पंचवटीतील कोर्णार्कनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांचाही कोरोना नमुना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून तो प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता.