पिंपळगावच्या औद्योगिक वसाहतीला मंदीचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:38 PM2019-09-05T16:38:01+5:302019-09-05T16:39:12+5:30
उत्पादनात घट : कामगार कपातीमुळे बेरोजगारीचे संकट
गणेश शेवरे/पिंपळगाव बसवंत : मंदीचा विळखा येथील औद्योगिक वसाहतीलाही पडत चालला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी ५० ते ६० टक्के उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम कामगारांवर होत आहे.औद्योगिक वसाहतीतील ८० हून अधिक कंपन्यांनी मंदीच्या सावटामुळे कामगारांची मोठी कपात केल्याने सुमारे ६०० कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे .
नाशिक जिल्हयातील सुवर्ण त्रिकोणातील व्यापारी शहर व मिनी दुबई म्हणून ओळखले जाणारे पिंपळगाव बसवंत हे औद्योगिक प्रगतीचं उत्तम उदाहरण मानले जाते. पण आता पिंपळगाव बसवंतची हीच ओळख बदलणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. कृषी अवजारे आणि निविष्ठा क्षेत्रावरचे मंदीचे ढग गडद होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही क्षेत्रांमध्ये ५० ते ६० टक्के उत्पादनात घट होताना दिसत आहे. औद्योगिक वसाहतीत मंदीचे सावट असल्याने शेकडो असंघटीत कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून कंपनी चालकही आर्थिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत मंदीचे मळभ दूर होत नाही, तोपर्यंत छोट्या कंपन्यांना बँक कर्ज ,जी.एस.टी व वीज बिलात सूट द्यावी अशी मागणी कंपनी चालकांकडून केली जात आहे.