औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेचा संकल्प
By admin | Published: October 25, 2015 11:01 PM2015-10-25T23:01:48+5:302015-10-25T23:03:14+5:30
संयुक्त बैठक : उद्योजकांकडून पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली सहकार्याची अपेक्षा
सिन्नर : औद्योगिक वसाहतीत सर्वांनी एकजूट दाखवून एकमेकांना सहकार्य केले तर औद्योगिक वसाहतीची सुरक्षा चांगली राहील. उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. मात्र त्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी व्यक्त केली.
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात उद्योजक सभासद, स्टाईसचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्योजकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी पोलीस अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मात्र उद्योजकांनीही काही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्यासपीठावर औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष पंडित लोंढे, संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, पोलीस उपनिरीक्षक संगीता बाविस्कर यांच्यासह संचालक उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी आवारे यांनी उद्योजकांच्या वतीने संस्थेच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेबाबत असलेल्या अडीअडचणी मांडल्या. त्यात चोऱ्या, रस्तालूट, प्रत्येक महिन्याला कामगारांच्या पगाराच्या कालावधीत रात्री ७ ते १० यावेळेत किंवा कधी दिवसाढवळ्या कामगार पायी जात असताना त्यास रस्त्यात अडवून त्याच्या खिशातील पैसे, मोबाइल, अंगावरील दागिने, वस्तूंची चोरी करून त्याला होणारी मारहाण, मारहाण करणारे चोर मोटारसायकलवर तोंड बांधून येत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी दीपावलीच्या काळात गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी आवारे यांनी केली. त्यावर पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी उद्योजकांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. उद्योजकांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर नाईट व्हिजन असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, कंपनीच्या गेटवर बायोमेट्रिक मशीन बसवावे, सुरक्षारक्षकाकडे बॅटरी, काठी, शिट्टी असू द्यावी, संपर्कासाठी त्याच्याकडे लॅण्डलाईन अथवा मोबाइल फोन असावा असे सपकाळे यांनी सांगितले. प्रत्येक कंपनीच्या गेटवर पोलीस ठाण्याचा क्रमांक असावा असे ते म्हणाले. कंपनीत काम करणाऱ्या सर्व कामगारांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आदि माहिती उपलब्ध असावी, बालकामगार नसावा, गुन्हेगारी वृत्तीच्या कामगारास कामावरून काढून टाकावे, कामगार व मालकात नेहमी समन्वय असावा, महिला कामगारांसाठी स्वतंत्र महिला कक्ष असावा अशा सूचना सपकाळे यांनी यावेळी केल्या. पोलिसांनी केलेल्या सूचना पूर्ण करण्याबाबत संस्था सर्व उद्योजकांना एक परिपत्रक काढून माहिती देणार असल्याचे अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे यांनी सांगितले. (वार्ताहर)
एमआयडीसी कार्यक्षेत्रातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राशेजारील पश्चिमेकडील गणेशनगर, शंकरनगर व इतर उपनगरांत अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. गावठी दारु विक्री, जुगार, मटका तसेच बेकायदेशीररीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्याचा उद्योजक सभासदांना त्रास होतो. त्यामुळे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.