उद्योग विभागाकडून मालेगावी रोजगार विनिमय केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:02 AM2019-06-15T02:02:48+5:302019-06-15T02:04:36+5:30
वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून, तिच्या वृद्धीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मालेगाव : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून, तिच्या वृद्धीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मालेगाव औद्योगिक क्षेत्रातील सायने बु।। व अजंग-रावळगाव औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड नोंदणी शुभारंभाप्रसंगी व येथील यशश्री कम्पाउण्डमध्ये आयोजित केलेल्या उद्योजक परिषदेत उद्योगमंत्री देसाई बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, केंद्र व राज्य शासन औद्योगिक वसाहतीत उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील आहे. राज्याच्या उद्योग विभागाकडून मालेगावी रोजगार विनिमय केंद्र सुरू करण्यात येईल. जनतेने व शासनाने एकत्र येऊन प्रकल्प पूर्णत्वास न्यावा. एमआयडीसीतील भूखंड विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वीज दर कमी करणार
महिलांसाठी औद्योगिक धोरण ठरविणारे महाराष्टÑ पहिले राज्य आहे. महिला उद्योजकांनी एमआयडीसीत गुंतवणूक केल्यास १०० टक्के गुंतवणूक परत केली जाईल. उद्योग-धंद्यांसाठी विजेचे दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.