दुभाजकांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:03+5:302021-02-07T04:14:03+5:30
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या नाशिक : शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर ...
मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
नाशिक : शहरातील जुने नाशिक आणि पंचवटी भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारे गुरे तसेच श्वानांचा संचार वाढला आहे. विशेष म्हणजे रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी
नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नियम असले तरी प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. सध्या नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, काही नागरिक तर मास्क खाली करून थुंकत असल्याने अशा नागरिकांवरदेखील कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जि.प. परिसरात पुन्हा ट्राफिक समस्या
नाशिक : जिल्हा परिषद परिसरातील रस्त्यावर नागरिकांकडून पूर्वीपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी करून ठेवली जातात. त्यात आता या परिसरात जि.प.च्या भिंतीलगतचा भाग खोदून ठेवण्यात आला असल्याने तर वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. अनेकदा वादावादीचे प्रकारदेखील घडतात.
--------
दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांमुळे अडथळा
नाशिक : दिंडोरी रोडवर भाजी विक्रेत्यांनी रस्त्यालगत लावलेल्या रांगा, छोटे-मोठे विक्रेते दुकाने लावत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने चारचाकी वाहने चालविताना वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
जुन्या वाहनांनी अडवले रस्ते
नाशिक : द्वारका ते जुना आडगाव नाका परिसरात जुन्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पर्यटकांच्या गर्दीत वाढ
नाशिक : शहरालगतच्या निसर्गरम्य स्थळांवर आठवडाअखेरीस सहलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्यापासून सर्वच पर्यटन स्थळांवर नागरिक आठवडाअखेरीस मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोकाट श्वानांकडील दुर्लक्षामुळे नाराजी
नाशिक : शहरातील सारडा सर्कल, गंजमाळ परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्री हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काहीवेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडून काहीवेळा दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.