कांद्यावर करपाचा प्रादुर्भाव
By admin | Published: January 24, 2017 11:04 PM2017-01-24T23:04:59+5:302017-01-24T23:05:17+5:30
खामखेडा : पीक वाचविण्यासाठी धावपळ
खामखेडा : सततच्या बदलण्याऱ्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा व मावा रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत अहे. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. मात्र चालू वर्षी कांद्याला बाजारभाव नाही. परिणामी हाती उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीही सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उन्हाळी कांद्याची रोपे खराब झाली होती. तेव्हा पुन्हा शेकऱ्यांनी गाव, परिसरात व तालुक्यातून महागडी बियाणे आणून शेतात टाकली होती. त्यावेळेस पुन्हा वातावरणात बदल झाल्यामुळे काही रोपे उगली तर काही उगलीच नव्हती. तेव्हाही उत्पादन खर्च वाया गेला होता. पुन्हा महागडी बियाणे विकत आणून बियाणे टाकली. रोपे तयार झाली. कांद्याची लागवड करण्यात आली. दरम्यानच्या काळात वातावरणात थंडी जाणवू लागल्याने कांद्याचे पीक जोमात होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. परंतु ऐन पीक जोमात असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आणि त्यांचा परिणाम पिकांवर होऊ लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. (वार्ताहर)