भाताच्या लागवडीवर महागाईचे सावट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 06:34 PM2021-07-27T18:34:58+5:302021-07-27T18:37:27+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर भात पिकाच्या लागवडीला सर्वत्र जोमाने सुरुवात झाली असून आवश्यक साधनांची, बियाणांची व खतांची खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका अप्रत्यक्षपणे शेतक-यांना लागवडीसाठीही बसत असून वाढत्या महागाईबरोबर लागवडही आता महाग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर भात पिकाच्या लागवडीला सर्वत्र जोमाने सुरुवात झाली असून आवश्यक साधनांची, बियाणांची व खतांची खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान इंधन दरवाढीचा फटका अप्रत्यक्षपणे शेतक-यांना लागवडीसाठीही बसत असून वाढत्या महागाईबरोबर लागवडही आता महाग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
भात पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात एक वेगळी ओळख आहे. धरणांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबर बागायती पिके घेण्याकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पावसाळ्यात पारंपरिक भात पिके घेण्यासाठी शेतकरी सज्ज असतो. पारंपरिक भाताच्या बियाणाला बगल देऊन नवनवीन व संकरित बियाण्यांची लागवड करून कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरही अधिक भर आहे. देशात इंधनाच्या दारात भरमसाठ वाढ होत असल्याने या इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसत आहे.
पशुधन घटल्याचा परिणाम
तालुक्यातील पशुधनात लक्षणीय घट झाल्याने शेतीच्या मशागतीसह पेरणीसाठी तालुक्यातील शेतकरी यंत्र व ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने पूर्वी ५०० ते ६०० रुपये प्रतीतासी भाड्याने मिळणारा ट्रॅक्टर आता कोरड्या मशागतीसाठी ७०० तर गाळासाठी ८०० ते ८५० रुपये प्रतिताशी मिळत आहे. याबरोबर पशुधन घटल्याने बैलाचे औत रोजावर मजुरीने मिळणे दुर्मिळ झाले असून दोन वर्षापूर्वी १५० रुपये रोजाने मिळणारे औत ५०० रुपये प्रतीदिवसाची मजुरी देऊनही मिळत नाही.
संकरित बियाण्यांकडे वाढला कल
दरम्यान गेल्या तीन ते चार वर्षापासून कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाजारात नवनवीन दाखल होणाऱ्या संकरीत बियाण्याच्या लागवडीला प्राधान्य दिल्याने, या संकरित बियाणाच्या उत्पन्नात भाताची भेसळ अधिक प्रमाणात येत असल्याने शेतक-यांना दरवर्षी सुधारित बियाणे खरेदी करावे लागत आहे. बियाणाच्या किमतीतही दरवर्षी भरमसाठ वाढ होत असते.
इरलेही झाले महाग
भात पिकाच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या पानघोंगडे (इरले) तसेच लोकरीपासून तयार होणारी घोंगडी यांच्याही किंमतीत यावर्षी भरमसाठ वाढ झाली आहे. बांबूच्या लाकडापासून तयार होणारा पान घोंगड्याचा साठा पुर्वी ६० ते ७० रुपयांना मिळत होता. हाच साठा आता १५० ते २०० रुपयांना मिळत आहे तर घोंगड्याच्या किमतीत यावर्षी दुप्पट वाढ झाली आहे.
हाती काही नाही लागत
महागडी बियाणे, खते, औजारे, व साहित्य खरेदी करून महागाईला तोंड देऊन पेरणी केलेली शेतातून उत्पन्न घेण्यासाठी शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करावे लागते. भाताची पेरणी, लागवड, निंदणी, कापणी यासाठी भरमसाठ मजुरी द्यावी लागते. परिणामी यातून शेतकऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याच्या अनुभव दरवर्षी शेतकऱ्यांना येत असतो.