व्यावसायिकांसमोर नवे संकट! गुढीपाडव्याच्या हार-कड्यांवर महागाई, कारागीर टंचाईची ‘संक्रांत’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:52 PM2022-03-26T12:52:00+5:302022-03-26T12:56:02+5:30
नाशिक : होळी, रंगोत्सवानंतर आता घरोघरी गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेच्या गाठी म्हणजे ...
नाशिक : होळी, रंगोत्सवानंतर आता घरोघरी गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हार-कडे बनविण्याची व्यावसायिकांची लगबग सुरू आहे; मात्र वाढती महागाई, हार-कड्यांची कमी झालेली मागणी आणि कुशल कारागीरांची कमतरता यामुळे हार-कडे बनवणाऱ्या व्यावसायिकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी मागील दोन महिन्यांपासून हार-कड्यांचे उत्पादन सुरू केले आहे; मात्र गत काही वर्षांपासून या लघुउद्योजकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. या व्यवसायासाठी साखर, दूध, लिंबू असा कच्चा माल लागतो; मात्र आरोग्याच्या दृष्टीने अनेकजण साखरेचा वापर टाळत असल्याने हार-कड्याची मागणी घटली आहे. पूर्वी किलोने घेतले जाणारे हे हार-कडे आता केवळ पूजाविधीसाठी घेतले जातात. त्यामुळे दहा ते पंधरा वर्षांचा विचार करता त्याची मागणी पन्नास टक्क्यांनी घटली आहे. तसेच हार-कडे तयार करण्यासाठी लागणारे लाकडी साचे घडवणाऱ्या कारागीरांची देखील टंचाई भासत आहे. या साच्यांसाठी लागणारे सागवाड लाकूड सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे देखील व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. एका साच्यासाठी ५ ते ६ हजार रुपये खर्च येत असल्याचे कारागीरांनी सांगितले.
साखरगाठीची रेसिपी साधारण वाटत असली तरी त्यामागे मोठी मेहनत घ्यावी लागते. हार-कडे तयार करण्यासाठी सुरुवातीला एका कढईला उष्णता देऊन त्यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. पुढे हेच साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात.
पूर्वी प्रत्येक ग्राहक दोन-तीन किलोप्रमाणे हार-कडे खरेदी करत. आता ते प्रमाण खूपच कमी झाले असून केवळ पूजाविधीसाठी खरेदी केली जाते. त्यात वाढती महागाई, लाकडी साचे तयार करणारे कारागीर मिळत नाही. एका साच्यासाठी पाच-पाच हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे व्यवसाय परवडेनासा झाला आहे.
- पार्वताबाई वाडेकर, व्यावसायिक