कर्जमाफीसाठी नाशिक जिल्ह्यातील ४७ हजार शेतक-यांची माहिती जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:53 PM2018-03-10T14:53:56+5:302018-03-10T14:53:56+5:30
राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगष्ट महिन्यापासून शेतक-यांकडून आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतक-याची व त्याच्या कुटुंबियांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व
नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीक कर्ज घेतांना खातेदाराने बॅँकेला दिलेली माहिती व शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गंत आॅनलाईन भरलेल्या माहितीचा ताळामेळ बसत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ४७ हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतक-यांचा प्रतिसाद मिळाला आहे.
राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगष्ट महिन्यापासून शेतक-यांकडून आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतक-याची व त्याच्या कुटुंबियांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व त्याची खात्री पटल्यानंतरच त्यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. प्रत्यक्षात शेतक-याच्या हातात कर्जमाफीची रक्कम न देता जिल्हा बॅँकेच्या त्याच्या कर्जखात्यााात पैसे भरून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील १,४७,७८३ शेतक-यांनी सरकारकडे आॅनलाईन अर्ज केले व त्यातील ९७,५५० शेतक-यांना छाननीत पात्र ठरविण्यात आले. जिल्ह्यातील शेतक-यांकडील ७६४.०७ कोटी रूपये कर्जमाफी होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षातमात्र ४२९.६३ कोटी रूपयांचीच कर्जमाफी मिळाली आहे. जवळपास ५०३३३ शेतक-यांना शासनाने अपात्र ठरवून त्यांची यादी पुन्हा जिल्हा बॅँकेकडे जानेवारी महिन्यात परत पाठविली व शेतक-यांनी भरलेली चुकीच्या माहितीची दुरूस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. त्यात प्रामुख्याने कर्जदार पत्नी असता पतीने अर्ज भरणे, आधार क्रमांक नसणे, भ्रमणध्वनी क्रमांक न देणे, कर्जाची रक्कम चुकणे, त्याच बरोबर २०१७ पर्यंतच्या कर्जाचा उल्लेख करणे अशा प्रकारच्या चुका असल्याने जिल्हा बॅँकेने सदरची यादी बॅँकेच्या प्रत्येक शाखेत पाठवून त्या त्या शेतक-यांनी त्याची पुर्तता करण्याचे आवाहन केले. परंतु बॅँकेच्या या आवाहनाला फक्त तीन हजार शेतक-यांना प्रतिसाद मिळाला. याचाच अर्थ शेतक-यांनी चुकीचे अर्ज भरले असून खरी माहिती दडविली असावी असे बॅँक व्यवस्थापनाला वाटू लागले आहे. त्यामुळे जवळपास ४७ हजार शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून आता वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.