‘साग्रसंगीत’ पार्टीची मुख्यमंत्र्यांनी मागविली माहिती पोलिसांकडून दिवसभर चौकशी, उत्पादन शुल्काचे ‘ते पत्र’ चौकशीच्या फेऱ्यात
By admin | Published: February 3, 2015 12:53 AM2015-02-03T00:53:43+5:302015-02-03T00:54:11+5:30
‘साग्रसंगीत’ पार्टीची मुख्यमंत्र्यांनी मागविली माहिती पोलिसांकडून दिवसभर चौकशी, उत्पादन शुल्काचे ‘ते पत्र’ चौकशीच्या फेऱ्यात
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीमुळे गेल्या शनिवारी (दि.३१) रात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या साग्रसंगीत पार्टीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, त्याबाबतचा अहवाल तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या गंभीर बाबीबाबत तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून अहवाल मागवू, असे सांगितले. त्याचप्रमाणे काल याबाबत पोलीस यंत्रणेकडूनही या पार्टीची दखल घेतली गेली असून, काल दिवसभर पोलीस उपअधीक्षक गुंजाळ यांच्याकडून पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अहवाल मागविला आहे. दुसरीकडे बांधकाम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांना चौकशीत दिल्याचे समजते. याबाबत काल दिवसभर या साग्रसंगीत पार्टीचीच चर्चा शहर व जिल्हा परिसरात असून, शासकीय जागेत असे सेवानिवृत्ताचे कार्यक्रम शासकीय जागेत आणि तेही मद्यपान व संगीताच्या तालावर कसे घेतले जाऊ शकतात, असा प्रश्न नागरिकांनी, तसेच काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. मुळातच उत्पादन शुल्क विभागाने मद्यसेवनाचा परवाना थेट ओझर विमानतळाच्या नावाने दिलेला असल्याने हे परवानगीचे पत्र वादात सापडण्याची चिन्हे आहेत. हर्ष कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत विलास बिरारी यांनी हा ३१ तारखेचा एक दिवसाचा या सेवानिवृत्तीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात मद्यसेवनाचा परवाना काढला होता.