दिव्यांग मतदारांच्या माहितीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:48 AM2019-09-03T00:48:17+5:302019-09-03T00:48:36+5:30
मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे.
नाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार असल्याने मतदान केंद्रनिहाय त्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख इतकी आहे.
गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील टक्का अपेक्षित नसल्याने विधानसभेत मतांचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. निर्दोष यादी करण्यासाठी निवडणूक शाखेने मोठी मोहीम राबविली आणि सुमारे ५६ हजार दुबार आणि मयत नावे यादीतून काढून टाकली. तर नव्याने १९ हजारांपेक्षा अधिक नावे यादीत समाविष्ट झाली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार विधानसभेसाठी मतदान करणार आहेत.
लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणाऱ्या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. विधानसभेच्या मतदार यादीतील स्त्री आणि पुरुष मतदारांप्रमाणेच तृतीय पंथियांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ३५ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद अंतिम मतदार यादीत करण्यात आलेली आहे.
दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या
निवडणूक शाखेने अपंगांना प्रमाणपत्र देणाºया जिल्हा शासकीय रुग्णालये, अपंगांसाठी योजना राबविणाºया समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अपंग कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांगांचा मतदार म्हणून नोंद करतानाच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या जात आहेत.