परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत देता येणार माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:56+5:302021-07-26T04:13:56+5:30
नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित ...
नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्न बँक खात्याची माहिती तत्काळ मागविण्यात आली आहे. ही माहिती सादर करण्यास देण्यात आलेली ३१ मेपर्यंतची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्क माफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ - २०मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांना कोरोनामुळे माहिती सादर करण्यात अडचणी निर्माण झाल्याने राज्य मंडळांने याविषयीची सविस्तर माहिती सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. यानुसार बँक खात्याचा तपशिल प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
इन्फो-
प्रतिपूर्तीचा लाभ थेट बँक खात्यात
परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावरून एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती राज्य मंडळाला वेळेत मिळणे आवश्यक आहे. ही माहिती वेळेत उपलब्ध न झाल्यास या लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीत मंडळाला सादर करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.