योजनानिहाय तरतुदींची मागविली माहिती
By Admin | Published: February 24, 2016 11:28 PM2016-02-24T23:28:35+5:302016-02-24T23:30:26+5:30
योजनानिहाय तरतुदींची मागविली माहिती
नाशिक : २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विविध विभागांच्या योजनानिहाय किती रकमेची तरतूद करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्यात यावी, असे आदेश उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती प्रकाश वडजे यांनी दिले आहेत.
बुधवारी (दि. २४) यासंदर्भात अर्थसमितीची मासिक बैठक उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस विभागनिहाय सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यात सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विविध विभागाच्या विविध योजनांसाठी किती रकमेची तरतूद करण्यात आली होती, या तरतुदीतून कोणकोणत्या योजना राबविण्यात आल्या, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला.
याबाबतची माहिती सर्व विभागांना सादर करण्याच्या सूचना प्रकाश वडजे यांनी दिल्या. तसेच मूळ अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत बदल करून शुद्धिपत्रक पारित केलेले आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती तयार करून पुढील सभेत ठेवावी,अशा सूचना प्रकाश वडजे यांनी विभागाला दिल्या. ही सभा १ मार्च रोजी होणार आहे. अर्थ समितीच्या मासिक बैठकीस स्मिताताई बिवाल, इंदूमती खोसकर, विलास माळी, ताईबाई गायकवाड, मंदाबाई निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.जी. सोनकांबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)