विविध शासकीय योजनांद्वारे नागरिकांना मूलभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:47 AM2019-08-17T00:47:32+5:302019-08-17T00:47:52+5:30
शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असून, त्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
नाशिक : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असून, त्यांचे जीवन संपन्न करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी उपस्थित होते. यावेळी विखे-पाटील म्हणाले, शहरे विकसित व सुंदर करण्याबरोबरच शासनाने कृषी विकासालादेखील प्राधान्य दिले आहे. यासाठी मागेल त्याला शेततळे, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात येत आहे, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
याअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शहरी विभाग रिद्धी पवार, सीबीएससी व आयसीएससी अभ्यासक्र मातील मुग्धा बोराडे, गार्गी जोशी, गार्गी जोशी, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मनस्वी कदम, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत वेदांत देव या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
पोलिसांना विविध पुरस्कारांचे वितरण
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस विभागात बजावलेल्या सेवेबद्दल विशेष सुरक्षा सेवा पुरस्कारासाठी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांना अंतरिम सुरक्षा पदक, पोलीस निरीक्षक संजय सांगळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडके, दानिश मन्सुरी, रूपेश काळे व पोलीस नाईक श्रीधर बाविस्कर यांना विखे-पाटील यांच्या हस्ते विशेष सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, विजय गोपाळ यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
ग्रामस्वच्छता पारितोषिक
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिक शिरसाणे
(ता. चांदवड) ग्रामपंचायत प्रथम, लोखंडेवाडी (ता. दिंडोरी) द्वितीय व हनुमाननगर (ता. निफाड) व बोरवट (ता. पेठ) या ग्रामपंचायतींना तृतीय क्र मांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अंतर्गत नाशिक विभागातील जळगाव येथील विजयकुमार वाणी यांना प्रथम पुरस्कार, रामहरी सुरसे, नाशिक यांना द्वितीय क्रमांकाच्या वैयक्तिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यासोबतच विभागस्तरीय शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्थेला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे या पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर ग्रुप ग्रामपंचायतला प्रथम पुरस्काराने राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विखे-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.