सिन्नरमध्ये पावसाळापूर्व उपाययोजनांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:12+5:302021-05-29T04:12:12+5:30
सिन्नर शहरातील अनेक धोकादायक इमारती आता कमी झाल्या असल्या तरी काही इमारती व घरे अद्याप धोकादायक आहेत. पावसाळ्यात त्याची ...
सिन्नर शहरातील अनेक धोकादायक इमारती आता कमी झाल्या असल्या तरी काही इमारती व घरे अद्याप धोकादायक आहेत. पावसाळ्यात त्याची पडझड होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी नगर परिषदेकडून काळजी घेण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमित साफसफाईत, गटार व नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी वेगळ्या कोणत्याही निधीची तरतूद नगर परिषदेने केलेली नाही. शहरातील बहुतांश रस्ते डांबरी व काॅंक्रिटीकरणाचे असल्याने ते सुस्थितीत आहेत. उपनगरात काही भागात पावसाळ्यात चिखल होतो. त्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. कोरोनामुळे रस्ता दुरुस्ती अथवा नवीन रस्ता बनविण्याच्या कामांना सध्यातरी कोणतीही अडचण नसून काही ठिकाणी कामे सुरू आहेत.
शहरात अनेक ठिकाणी बंदिस्त गटारी आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा फारसा प्रश्न निर्माण होत नाही. तथापि, प्लास्टिक अडकल्याने काही ठिकाणी गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत असते. शहरातून सरस्वती नदी वाहते. त्यामुळे या नदीच्या स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी नगर परिषदेने सरस्वती नदीस्वच्छता व सुशोभीकरण मोहीम राबविली होती. सुमारे दीड कोटी रुपयांतून नदीच्या दोन्ही बाजूंना काॅंक्रिटीकरण भिंती बांधणे, स्वतंत्र सांडपाण्याची व्यवस्था आदींसह विविध कामे करण्यात आली होती. सांडपाणी बाजूने जाण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सरस्वती पुलावर काही व्यावसायिकांकडून त्यात कचरा व घाण टाकली जात असल्याने दुर्गंधी सुटते. पावसाळापूर्वी गटारी व सरस्वती नदीच्या स्वच्छतेबाबत नगर परिषदेने दैनिक स्वच्छतेशिवाय अद्याप कोणतेही खास व्यवस्था केलेली दिसत नाही.
कोट....
दरवर्षी शहरातून वाहणाऱ्या बंदिस्त गावपाटाचे पाणी तुंबून सिन्नर-शिर्डी रस्त्यावर येऊन दुर्गंधी सुटत होती. त्यामुळे गावपाट बंदिस्त करण्यासाठी नगर परिषदेने नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच सदर काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येणार नाही.
- किरण डगळे, नगराध्यक्ष, सिन्नर