भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडी जखमी
By admin | Published: February 1, 2017 10:35 PM2017-02-01T22:35:42+5:302017-02-01T22:35:59+5:30
बंदोबस्ताची मागणी : भयभीत महिलांचे पालिकेला निवेदन
सिन्नर : भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली. शनिवारी
दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात सदर घटना घडली. जिल्हा रुग्णालयात अडीच वर्षाच्या मुलीवर उपचार केल्यानंतर गौतमनगर भागातील भयभीत महिलांनी नगरपालिका कार्यालयात
जाऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष किरण डगळे यांना
दिले.
येथील तहसील कार्यालयाच्या भिंतीला लागूनच गौतमनगर परिसर आहे. या भागात राहणारी दर्शना कांतीलाल कोरडे ही अडीच वर्षाची चिमुरडी तहसील कार्यालयाच्या आवारात खेळत होती. यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर
हल्ला केला. त्यानंतर अन्य ५ ते ६ कुत्र्यांनी या चिमुरडीवर हल्ला करून तिला सुमारे दहा मीटर अंतर ओढत नेले. सदर प्रकार पाहून नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून या चिमुरडीची सुटका केली. त्यानंतर जखमी दर्शना हिला पालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दर्शनाच्या मांडीला, डोक्याला व मानेजवळ असे सुमारे ६० टाके पडले असल्याची माहिती कोरडे कुटुंबीयांनी दिली.
नगराध्यक्ष डगळे यांना दिलेल्या निवेदनावर शीतल कोरडे, मीना जोशी, शकुंतला आरणे, ताराबाई जगताप, योगीता गायकवाड, स्वप्नाली जाधव, शांताबाई जाधव, छाया चव्हाण, यमुना सानप, कविता गोडे, शांताबाई सोनवणे, रेखा
घोलप, शीतल गवळी यांच्यासह रहिवाशांची नावे आहेत. (वार्ताहर)