बोटावरची शाई, तिकिटासाठी घाई
By admin | Published: October 16, 2014 12:30 AM2014-10-16T00:30:08+5:302014-10-16T18:59:36+5:30
बोटावरची शाई, तिकिटासाठी घाई
नाशिक : कुणी एकटे तर कुणी जोडीने महाकवी कालिदास कलामंदिरातील तिकीट खिडकीवर बोटावरील शाई दाखवत होते आणि ‘छापा-काटा’ या नाटकाचे सवलतीत तिकीट मिळवित आपले आसन आरक्षित करत होते. फ्रेंड्स सर्कलने राबविलेल्या मतदारजागृती विशेष अभियानाला नाट्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आपले नाट्यप्रेमही व्यक्त केले.
मतदारजागृतीसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू असताना, नाट्य व्यवसायात असलेल्या फ्रेंड्स सर्कलनेही मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी नाटकाचे सवलतीत तिकीट देण्याची योजना राबविली. फें्रड्स सर्कलने मुक्ता बर्वे निर्मित व अभिनित ‘छापा-काटा’ या नाटकाचा प्रयोग येत्या रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित केला आहे. मतमोजणीच्या दिवशी होणाऱ्या या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी फें्रड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर यांनी सवलतीत तिकीट देण्याची योजना आखली; परंतु त्यासाठी मतदानाचा आग्रह
धरला.
जो मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरची शाई दाखवेल त्याला तिकिटात तब्बल शंभर रुपयांची सवलत त्यांनी बहाल केली. एक हजार आसनक्षमतेच्या कालिदास कलामंदिरात आपले आसन आरक्षित करण्यासाठी नाट्यरसिकांनी मतदान करताच कालिदासकडे धाव घेतली आणि तिकिटाची सवलत प्राप्त केली. या योजनेला दिवसभरात चांगला प्रतिसाद लाभल्याचे जातेगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)