ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे २ कार्यकर्ते ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 02:58 PM2021-12-05T14:58:40+5:302021-12-05T16:17:26+5:30
साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले असताना गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे. कुबेर हे साहित्य संमेलनातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना दोन जणांनी त्यांच्यावर शाई फेकली. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आपण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं दोघांनी सांगितलं.
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. त्याचा निषेध म्हणून कुबेरांवर शाई फेकल्याचं ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी स्वीकारली. आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कोणताही पश्चाताप वाटत नाही. कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असं रोटे पाटील यांनी म्हटलं.
पुस्तकाबद्दल आक्षेप काय?
'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. 'संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,' असं रोटे पाटील म्हणाले.
सकाळपासूनच कुणकुण होती- भुजबळ
संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांचा निषेध केला जाईल. निवेदन देऊन ते निषेध व्यक्त करतील असं मला वाटलं होतं, असं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. पुण्यातून २ जण मोटरसायकलवरून आले होते. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ मोटारसायकलचा वेग कमी करत दोघांनी काळी पावडर फेकली. त्यावेळी पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.