आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:49 PM2020-10-18T22:49:58+5:302020-10-19T00:18:29+5:30

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Innocent souls are the victims of modernity | आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

आततायीपणामुळेच निष्पाप जिवांचे बळी

Next
ठळक मुद्देपूर्वसूचना देणाऱ्या फलकांची गरज : बुडून मृत्यूच्या घटनांत होतेय वाढ

लोहोणेर : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा- महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे खास करून युवा वर्ग वैतागून गेला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्गसानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात... तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पोहोण्याचे आकर्षण...पाण्याचा अंदाज नाही..नीटसे पोहता येत नाही.. मग यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात एकापाठोपाठ झालेल्या पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची महामारी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतेही कार्यक्रम नाहीत, मोठे लग्न समारंभ नाहीत, सण-उत्सव-यात्रा नाहीत. बाहेर कुठे फिरायला जावे म्हणावे तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती.. टीव्ही-मोबाइलचाही कंटाळा आलाय..फारसा कामधंदा नाही..यामुळे युवावर्ग घरात थांबण्यापेक्षा जवळपास कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या नैसर्गिक वातावरणात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे छोटी-मोठी धरणे, तलाव, तळी, नदीतील डोह, विहिरी सध्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. खरे तर शेतीसाठी पाण्याचे हे स्रोत गरजेचे आहेत पण मुलांच्या आततायीपणामुळे ते जीवघेणे ठरत आहेत. देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरात अशा चार व इतर तालुक्यांत अशा अनेक घटना घडल्याने यावर सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.

ज्या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता आहे किंवा यापूर्वी तशा घटना घडल्या आहेत. तिथे सावधगिरीचे फलक लावण्याची गरज आहे. यामुळे भविष्यात अशा घटना, धोके टळू शकतात. प्रत्येक आठवड्याला जिल्हाभरात बुडून मरणाऱ्यांची घटना काहीतरी सांगून जात असली तरी बोध घ्यायला कुणीच तयार होत नाही. पोहायला येत नसतांनाही पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते हे माहीत असूनही मित्रांच्या आग्रहाखातर हकनाक मरणाच्या दारात पोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. बैलपोळा, गणेशमूर्ती विसर्जन, सहल अशा पार्श्वभूमीवर कितीतरी जीव बळी पडतात. नशीब बलवत्तर असले तर वेळेवर मदत मिळून जीवदान मिळू शकते, नाहीतर ते चार-पाच मिनिटं जीवनरेषा पुसण्यास पुरेसे ठरतात. या मृत्यूच्या सापळ्यात कोण केव्हा अडकेल हे सांगणे कठीण असले तरी सावधगिरीचा उपाय म्हणून तेथे पूर्वसूचना देणाऱ्या पाट्या व फलक लावण्याची खरी गरज आहे.

चोरचावडी (दहीवड ता.देवळा) येथील धबधब्यात दोन युवकांचा बुडून मृत्यू, वाखारी (ता.देवळा) येथील विहिरीच्या पाण्यात बुडून सैनिकाचा शेवट, रामेश्वर धरणावरील घटना, कळवणजवळ गिरणा नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू, मालेगावजवळ गिरणा नदीत बुडणाऱ्याची वाढती संख्या.. अशा कितीतरी घटना पाहता याबाबत विचार करण्याची गरज आहे ---- जितेंद्र आहेर, विरोधी पक्षनेते, देवळा नगरपंचायत
धबधबा असो की कोणतेही धरण-तलाव असो ...अशा ठिकाणी जागृतीपर फलक लावून धोक्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेतल्यास पुढील काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत.
- भारत कोठावदे, देवळा

Web Title: Innocent souls are the victims of modernity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.