मतदारांसाठी अभिनव प्रश्नावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:47 AM2019-07-24T00:47:10+5:302019-07-24T00:48:06+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक असाव्यात तसेच मतांचा टक्का वाढावा यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मतदारांसाठी प्रश्नावली तयार केली आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तसेच संकेतस्थळावर सदर प्रश्नपत्रिका पालकांना उपलब्ध होणार आहे. मतदानासंदर्भातील नऊ प्रश्नांची उत्तरे यामध्ये पालकांना द्यावयाची आहेत. अर्थात ही प्रश्नपत्रिका ऐच्छिक असून, मतदारांमध्ये नावनोंदणीसंदर्भातील जागरूकता तसेच यादीतील बदलाबाबत माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपक्रम राबविले जात असून, मतदारांमध्ये जनजागृतीदेखील केली जात आहे. मतदारांबरोबरच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठीदेखील त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. बोगस नावांची शोध मोहीम तसेच मयत मतदारांची नावे शोधण्याच्या मोहिमेलादेखील मोठे यश मिळाले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांनी मतदारांना जागरूक करण्यासाठी नऊ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आहे.
जिल्हाधिकाºयांच्या या प्रश्नावलीत आपले नाव मतदारयादीत समाविष्ट आहे का? आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत का? कुटुंबातील अठरा वर्षे पूर्ण होऊनही मतदान यादीत नाव न नोंदलेले कुणी आहे का? मतदार यादीतील नाव, पत्ता, लिंग, वय बरोबरच छापलेले आहे काय? कुटुंबात कुणी दिव्यांग मतदार आहे का? कुटुंबातील मयत व्यक्तीचे नाव कमी केले आहे का? मतदार यादीतले आपले नाव कोणत्या भागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रांवर आहे? २००९ मधील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे का? आगामी विधानसभा निवडणुकीत आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहात का? असे प्रश्न विचारून जागृती मोहिमेत जिल्हाधिकाºयांनी सहभाग घेतला आहे.
दुरुस्तीची संधी
सदर प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार असून, ती ते आपल्या पालकांकडून भरून घेणार आहेत. जेणे करून त्यांनी वरील प्रश्नांपैकी कोणत्याही दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतली जाणार आहे.