परमार्थ साधण्यासाठी अभिनव रोटी बँक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:16+5:302021-05-06T04:16:16+5:30
नाशिक : कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी ...
नाशिक : कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक उपक्रमात समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना घरपोच ५ किलो आटा दिला जातो. त्यातून निम्मा आटा त्यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी ठेवून उर्वरीत आट्याच्या पोळ्या बनवून दिल्यास त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी रोटी बँकच्या सामजिक कार्यकर्त्यांकडून पार पाडली जाते.
नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या अभिनव रोटी बँकेच्या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. यात प्राचार्य प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, कैलास पाटील, हेमंत राठी, हेमंत धात्रक, उमेश राठी, दिलीप भामरे, सचिन जोशी, संजय लोंढे, अजित पाटील, अरविंद महापात्रा, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. अनिता नेहते, डॉ. भरत केळकर, डॉ. राजेंद्र कलाल, डॉ. उल्हास कुटे, नानासाहेब सोनवणे, मिलिंद जाधव, समीर रकटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कोविडमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तर हजारो कुटुंबांतील कर्त्या नागरिकांना महिना, दोन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत किंवा पगारात मोठी कपात होत असल्याने त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अशा नागरिकांनादेखील समाजासाठी काही योगदान देण्याची इच्छा असते. मात्र, परिस्थितीअभावी त्यांना तसे शक्य हाेत नाही. अशा कुटुंबियांनादेखील मदत होऊ शकेल, तसेच त्यांना समाजासाठी काही याेगदान दिल्याचेही समाधान लाभू शकेल, असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न रोटी बँकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ९५४५४५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना ५ किलो आटा अर्थात गव्हाचे पीठ घरपोच दिले जाते. त्यातून निम्म्या पिठाचा त्यांनी कुटुंबासाठी वापर करुन उर्वरीत पिठाच्या शक्य तेवढ्या रोट्या करुन त्या गृह अलगीकरणामध्ये असलेल्या बाधित गरजूंना किंवा गरजूंना मोफत द्याव्यात, अशी रोटी बँकेमागील संकल्पना आहे.
इन्फो
या उपक्रमातून अडचणीत असलेल्या आणि कुणाकडे मागूदेखील शकत नसलेल्या निम्न मध्यमवर्ग स्तरातील कुटुंबांना मदतीचा हात मिळू शकेल. तसेच त्यांनादेखील कुणाला मदतीचा हात देण्याचे समाधान लाभेल, असा या रोटी बँकेमागील विचार आहे.
प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील