नंदिनी स्वच्छतेचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:04 AM2018-04-01T01:04:53+5:302018-04-01T01:04:53+5:30
प्लॅस्टिक, घाण व कचऱ्याने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाची महापालिकेने दखल घेतली आणि काही प्रमाणात स्वच्छता दिसू लागली आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांनीदेखील हातभार लावायला हवा, यासाठी पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी पुढाकार घेतला असून, शनिवारी उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांना नंदिनी नदीचा स्वच्छतेचा विषय देऊन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून अभिनव उपक्रम राबविला.
सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचऱ्याने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाची महापालिकेने दखल घेतली आणि काही प्रमाणात स्वच्छता दिसू लागली आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांनीदेखील हातभार लावायला हवा, यासाठी पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी पुढाकार घेतला असून, शनिवारी उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांना नंदिनी नदीचा स्वच्छतेचा विषय देऊन विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून अभिनव उपक्रम राबविला. नाल्यामध्ये टाकण्यात येत असलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नाशिक शहरातील नासर्डी म्हणजेच नंदिनी नदीची स्वच्छता करण्यात यावी यासाठी पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी गेल्या महिन्यात उपोषण केले होते. त्यानंतर महापालिका व पर्यावरणप्रमी संस्थेच्या माध्यमातून नदीपात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लॅस्टिक, कचरा याबरोबरच नाल्यामध्ये काही कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणीदेखील सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नंदिनीची स्वच्छता कायम रहावी यासाठी सभापती हेमलता पाटील यांच्याकडून प्रबोधनही करण्यात येत आहे. शनिवारी विद्यार्थ्यांसाठी माझ्या स्वप्नातील नदी, नदीची स्वच्छता, नदी स्वच्छतेचे फायदे, नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चित्रकलेच्या माध्यमातून चांगला संदेश दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी दर्शन पाटील, कल्पेश केदार, मनोज वाकचौरे, सुनील गुळवे, किरण शिरसाठ, सुनील सोनार, संजय सोनार, कल्पना गुंजाळ, सरला गामणे, वैशाली गायकवाड, अमोल धनगर, पूजा कदम, शेख, भाग्यश्री भोईर आदी उपस्थित होते.