अपर आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:22+5:302021-08-19T04:20:22+5:30
आदिवासी विकास विभागाचे नाशिक येथे आयुक्तालय असून, येथील अपर आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर योगेश विधाते हे कार्यरत आहेत. ...
आदिवासी विकास विभागाचे नाशिक येथे आयुक्तालय असून, येथील अपर आयुक्त कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर योगेश विधाते हे कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांनी वारंवार गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यांचे कामकाज असमाधानकारक असून, नागरिकांची कोणतीही कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. तरी विधाते यांच्या कामकाजाबाबत चौकशी करून त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, असे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आयुक्तांना ८ जून रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधितांना नोटीस काढण्यात आली असल्याचे आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट-
मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तालयात काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच जागी असून त्यांच्याकडील कामकाजात कोणताही बदल झालेला नाही. काहीजण प्रतिनियुक्तीवर आयुक्तालयात आले; मात्र त्यानंतर ते येथेच नियमित झाल्याचीही उदाहरणे असल्याची चर्चा आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.