मालेगावच्या तत्कालीन तहसीलदाराची खातेनिहाय चौकशी सुरू
By admin | Published: February 9, 2017 12:02 AM2017-02-09T00:02:27+5:302017-02-09T01:06:39+5:30
दणका : ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह ११ जणांच्या तक्रारीची दखल
अतुल शेवाळे मालेगाव
सध्याचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे तहसीलदार व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले आहेत. यावर स्वामी यांनी उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांना पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तहसीलदार पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.
मालेगावच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन प्रांताधिकारी संदीप पाटील व दीपक पाटील यांच्यातही खडाजंगी झाली होती.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, देवराज गरुड यांच्यासह इतर अकरा जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्कालीन तहसीलदार दीपक पाटील यांच्या कारकिर्दीविषयी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना विभागीय व खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तत्कालीन तहसीलदार पाटील यांची शिस्त व अपील नियम १९७९ च्या नियमानुसार दोषारोपपत्र तयार करून तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील उपविभागीय अधिकारी अजय मोरे यांनी तत्कालीन तहसीलदार पाटील यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले असून, तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती दिली.