अक्षय कुमारची 'हवाई सफर' वादाच्या भोवऱ्यात, भुजबळांकडून चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 01:40 PM2020-07-04T13:40:21+5:302020-07-04T13:43:55+5:30
अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत.
नाशिक - अभिनेता अक्षय कुमारचानाशिक त्र्यंबकेश्वर दौरा वादात सापडला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या हवाई दौऱ्याच्या चौकशीच आदेश दिले आहेत. अक्षयकुमारच्या वैयक्तिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असून जिल्हाधिकारी यांनी माध्यमातूनच यांसदर्भात माहिती समजली. याबाबत मला कुठलिही पूर्वकल्पना किंवा माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली नाही, याबाबत पोलिसांकडून माहिती मिळणे अपेक्षित होते, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हटले आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अक्षय कुमारचा दौरा होता, येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग होतं. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागतही केलं जातं. तसेच, अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयकुमारच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला. मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करावा, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वच हॉटेल्स अन् रिसॉर्ट बंद असतानाही, अक्षयसाठी तारांकीत रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले, येथे अक्षयकुमारचा पाहुणचार कसा झाला? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अक्षयकुमारच्या संपूर्ण दौऱ्याच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत.
यासंदर्भात पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यासंदर्भात आम्हाला कुठलिही माहिती माध्यमांना देण्यासंदर्भात वरिष्ठांची परवानगी नसल्याचे उत्तर दिले. मा, नाशिक जिल्हा आणि त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी ठिकाण हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. शेजारीच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे अंजनेरीपासून अगदी जवळच आहे. त्यामुळे, या भागात अशाप्रकारे अनोळखी हेलिकॉप्टरची सफर होते. मात्र, याची माहिती जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे नसते ही बाब गंभीर आहे. कोरोना लॉकडाऊन काळात अक्षय कुमार चक्क हेलिकॉप्टरने येतो आणि दोन दिवस दौरा करुन निघून जातो, ही बाब नाशिकच्या जनतेसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.