इन्सानियत बचाव संघर्षतर्फे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:06 AM2018-03-10T00:06:54+5:302018-03-10T00:06:54+5:30
आझादनगर : सिरीया लष्कराद्वारे स्थानिक मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो निष्पापांना जीव गमवावा लागत आहे.
आझादनगर : सिरीया लष्कराद्वारे स्थानिक मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. लष्कराकडून मानवतेवर क्रुर हल्ला चढविला जात असल्याच्या निषेधार्थ हाजी शेख खालीद यांच्या नेतृत्वाखाली इन्सानियत बचाव संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३ वाजता शहरातील शहिदो की यादगार या ठिकाणी धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन देण्यात आले. सिरीया येथे लष्करी दलातर्फे गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक नागरिकांना लक्ष्य करीत त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. काही महिन्यांपासून बॉम्ब हल्ले करून शहरे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये पुरुषांसह निरापराध स्त्रिया व लहान मुलेही ठार केले जात असूनही राष्टÑसंघ गप्प आहे. म्हणून राष्टÑ संघाने सिरीयाचे राष्टÑाध्यक्ष बशर-उल-असद यांच्यावर दबाव टाकून हल्ले बंद करण्यासही पुढे यावे तसेच केंद्र सरकारने सिरीयाच्या दूतावाससोबत संपर्क साधून या कृतीच्या विरोधात निषेध नोंदवित या प्रकरणी हस्तक्षेप करावा. अन्यथा दूतावासासोबतचे संबंध तोडण्यात यावे अशी मागणी इन्सानियत बचाव संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी मौलाना हाफीज अनिस अजहर, साबीर गौहर, हलीम सिद्दिकी यांची भाषणे झाली. या आंदोलनात अब्दुल लतीफ बागवान, अब्दुल हमीद जमाली, मुफ्ती हसनैन, मौलाना फिरोज आझमी, तुराबअली, सैखत जमालुद्दीन यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.