भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:53+5:302021-09-23T04:16:53+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल, मुळवड वळण व तिथून काही अंतरावरील पेठ तालुक्यातील बहुतेक गावांतील शेतकरी यांच्या भात व उडीद या पिकांवर मोठ्या प्रमाणात तांबेरा, करपा व टाके रोग पडला असून उडीद या पिकावर मोठे किडे व अळी दिसून येत आहे. त्यामुळे येथील परिसरातील शेतकरी हे चिंतातुर झाले आहेत.
या वर्षी एक तर पाऊस उशिरा पडला. त्यानंतर पुन्हा उघड व नंतर खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार व अधूनमधून पुन्हा उघडझाप यामुळे केवळ खरीप पिकावर येथील शेतकरी अवलंबून असल्याने या वर्षी आपल्या हातात काही लागणार नाही म्हणून बहुतेक खेडेगावांतील लोकांनी आतापासून आपला बाडबिस्तरा आवरून मजुरीसाठी शहराचा मार्ग धरला आहे.
त्र्यंबक तालुक्याला रोजगारासाठी स्थलांतराचा शाप आहे. मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या आणि वातावरणाच्या बदलामुळे येथील शेतकरी आता हळूहळू आपली पारंपरिक शेती कमी करू लागला असून पाच-दहा वर्षांपूर्वी नागलीसारख्या पिकाला तो दैवत (कंसरी) समजून पूर्ण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे पीक आता दिवसेंदिवस फारच दुर्मीळ झाले आहे.
अलीकडच्या काळात नागली पिकावर सतत किडीचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव व आदिवासी समाजातील कमी होणारी गायीगुरे आणि सध्या वापरात येणारी रासायनिक खते यामुळे नागलीसारख्या पिकाला आतापासून धोका निर्माण झाल्याने ज्या क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे, त्यावरही रोग दिसून येत आहे.
४-५ वर्षांपूर्वी भाताचे जेवढे क्षेत्र वाहतीसाठी वापरण्यात येत होते, तेवढ्याच क्षेत्रात नागली करण्यात येत होती. आता भारताच्या निम्म्या क्षेत्रावरच नागली करण्यात येत आहे. मुळातच कोरडवाहू शेतीसाठी अगदी भाजणी, नांगरणी, राब कोळपणी व अन्य मशागत यामुळे आपले पोट भरण्यापुरते का होईना शेती करणारा हा शेतकरी आता शहराकडे आकर्षित होऊ लागला असून या बाबत पुढील काळ हा चिंताजनक आहे, असे बोलले जात आहे.
परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभाग यांच्याकडे कीड नियंत्रण औषधे यांची मागणी पळशी येथील माजी सरपंच वामन कुंभार, दौलत खोटरे, कृष्णा खोकरे, प्रकाश कुंभार, काशिनाथ वाघले, शंकर कुंभार आदी ग्रामस्थ आदींनी केली आहे.
कोट...
हरसूल व पेठ तालुक्यांतील आमचा परिसर हा डोंगरउताराचा असून आमचे मुख्य पीक म्हणजे नागली, भात, वरई व डाळीसाठी उडीद हे पीक परंतु अलीकडच्या काळात आम्ही सतत येणारी रोगराई यामुळे आमच्या परिसरात काही असे शेतकरी होते की, ते या माळरानावर पन्नास ते शंभर पोते नागली पिकवणाऱ्या शेतकऱ्याला नागलीची भाकर मिळत नाही. उलट मोलमजुरी करून बाजरी, गहू विकत आणून खावे लागतात. तर, उडीद आम्ही आमच्यासाठी पुरेसे ठेवून बाकी आम्ही विकत होतो. या वर्षी आम्हीच विकलेले उडीद शंभर रुपये किलो दराने विकत घेऊन खातोय. ही अतिशय खेदजनक बाब आहे.
- रमेश ठाकरे, शेतकरी, पळशी बु॥
(२२ टीबीके)
220921\22nsk_31_22092021_13.jpg
भात-उडीद पिकावर किडीचा प्रादुर्भाव.