जिल्ह्यात कांदा लागला सडू शेतकरी

By admin | Published: August 6, 2016 10:42 PM2016-08-06T22:42:54+5:302016-08-06T22:43:09+5:30

संतप्त : शासन-व्यापाऱ्यांच्या भांडणात होरपळ

Inseparaton farmers started the onion | जिल्ह्यात कांदा लागला सडू शेतकरी

जिल्ह्यात कांदा लागला सडू शेतकरी

Next

दत्ता दिघोळे  नायगाव
शासनाच्या नियमनमुक्ती व व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांचा बंद व चालूच्या लपाझपीच्या खेळामुळे नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी साठवलेला हजारो क्विंटल कांदा सडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. शासन व व्यापाऱ्यांच्या वादात बळीराजा भरडला जात आहे.
वाढत्या महागाईला आळा बसावा व उत्पादन खर्चातून (अडतीच्या) शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांच्या पचनी पडला नाही. अनेक दिवस व्यापारीवर्गाने बंदची हाक देत बंद पुकारला, तर शासनाने शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत व्यापाऱ्यांनी समोरच्या खरेदीदारांकडून वसूल करावी, असा नियम रुजू करण्याची धोरणे (नियम) आखल्याने गेल्या काही दिवसांपासून कांदा मार्केट बंद पडल्याने तीन-चार महिन्यांपासून चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. शासन व व्यापारीवर्ग यांच्यातील तिढा सुटण्याचा कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे.
शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देताच बाजार समित्या सुरु झाल्या. मात्र, लिलावासाठी कांदा गोणीत भरून आणण्याचा नवीन फंडा व्यापाऱ्यांनी शोधून काढून शेतकऱ्यांना कात्रीत पकडून शासनाच्या नियमांना वेगळ्या मार्गाने खो घातला आहे. आधीच बाजार समित्या बंद-चालूच्या खेळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर गोण्यांचे मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना चार-पाच महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा सध्या जागेवरच सडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. नायगाव खोऱ्यातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी या परिसरातील हजारो क्विंटल कांदा सडल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांची अडतीमधून सुटका होण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय समाधानकारक असला तरी व्यापाऱ्यांच्या गोणी पद्धतीने तो शेतकऱ्यांना अडचणीचा व खर्चिक असल्याने या निर्णयाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलने केली. तथापि, त्याची व्यापारी व शासनाने दखल तर घेतलीच नाहीच; उलट या प्रश्नावर राजकारण सुरू केल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सध्या खोऱ्यातील शेकडो शेतकऱ्यांनी चाळीत सडलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याचा सपाटा लावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र बनल्या असल्याने शासनाने हकनाक या अडतीचा गोंधळ घातल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच व्यापाऱ्यांच्या आडमुठ्यापणामुळे शेतकरी अधिकच संतापला आहे.
सततच्या मातीमोल भावामुळे आर्थिक अडचणीत सापडत असलेला शेतकरी यंदा शासन व व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अधिक अंत न बघता लवकरात लवकर तोडगा काढून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. साठवलेला कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली जात आहे.
सध्या शेतकरी चारही बाजूने अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे सर्वच राजकीय नेते मात्र सध्याच्या परिस्थितीबाबत का बोलत नाही तसेच विविध चॅनेलवाले याकडे लक्ष का देत नाही व बळीराजाला मदत का करत नाहीत, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

Web Title: Inseparaton farmers started the onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.