धान्य वाटपासाठी मुदतवाढीचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:13+5:302020-12-03T04:24:13+5:30
नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार रेशनदुकानदारांच्या माध्यमातून रेशनवरील धान्यांचे वाटप केले जाते मात्र गेल्या काही महिन्यांत पुरवठ्याच्या अनियमितेमुळे ...
नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार रेशनदुकानदारांच्या माध्यमातून रेशनवरील धान्यांचे वाटप केले जाते मात्र गेल्या काही महिन्यांत पुरवठ्याच्या अनियमितेमुळे पूर्णपणे रेशनवाटप करण्यास विलंब होत असल्याने रेशनदुकानदारांवर ताण येत आहेत. गेल्या ऑक्टोबरपासून पुरवठा अधिकच विस्कळीत झाल्याने रेशनदुकानदारांना धान्य वाटपासाठी ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्याची मागणी रेशनदुकानदारांच्या संघटनेने केली आहे.
जिल्ह्यातील रेशनदुकानदारांच्या माध्यमातून अंत्योदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंबीयांना धान्य वितरित केले जाते. गेल्या सात महिन्यांपासून पंतप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्यांचा अतिरिक्त पुरवठादेखील रेशनदुकानदारांना करावा लागत आहे. परंतु अलीकडे धान्यांचा पुरवठा वेळेवर हेात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात धान्य पोहोचणे तसेच तेथून दुकानदारांपर्यंत धान्यांची वाहतूक करणे यात वेळ लागत असल्याने अनेक दुकानांपर्यंत धान्य पोहोचूदेखील शकलेले नाही. त्यामुळे दुकानदारांवर दोन महिन्यांचे धान्य वाटप करण्याचा ताण येत आहे.
प्रशासनाकडूनदेखील दखल घेण्यात आलेली आहे. नोव्हेंबरचे मोफत व नियमित धान्य वाटपासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने आता नोव्हेंबरचे धान्य डिसेंबर ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठीचा वेळ दुकानदारांना देण्यात ओला आहे. ज्या दुकानांमध्ये उशिरा धान्य पोहोचले आहे आणि त्यामुळे वाटपाला विलंब होत आहे शा दुकानदारांमुळे दिलासा मिळालेला आहे. मात्र नोव्हेंबरचे धान्य डिसेंबरमध्ये वाटप करताना डिसेंबरचे धान्य वाटप करण्याचेदेखील आव्हान असल्यामुळे डिसेंबरचे धान्य वाटप करण्यासाठीदेखील वाढीव वेळेची मागणी करण्यात आलेली आहे. दुकानदारांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्याची मागणी रेशनदुकानदार संघटनेने केली आहे.
--कोट--
रेशनच्या धान्यापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी वेळ वाढविणे अपेक्षित आहे. ज्या दुकानदारांना नोव्हेंबरचे धान्य वाटप करण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आलेली आहे त्यांनी वितरण सुरू केलेले आहे. मात्र डिसेंबरच्या वितरणाचा विचार करून ३१ तारखेपर्यंत वाढीव मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे.
- निवृत्ती कापसे, अध्यक्ष, रेशनदुकानदार संघटना.