पहिल्याच दिवशी ६८० रेल्वे प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:57 AM2020-11-27T00:57:45+5:302020-11-27T01:00:13+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गुरुवारपासून वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २१ संशयित रुग्ण आढळले.
नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गुरुवारपासून वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २१ संशयित रुग्ण आढळले.
रेल्वेस्थानकात महापालिकेने प्रत्येकी तिघांचा समावेश असलेली तीन वैद्यकीय पथके नेमली आहेत. त्यांना रेल्वे सुरक्षा बल, तिकीट तपासणीस व रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत मिळत आहे. कोरोनामुळे नेहमीच्या प्रवासी रेल्वे बंद असून, कोविड स्पेशल आणि फेस्टिव्हल स्पेशल गाड्याच सुरू आहेत. गुरुवारपासून नाशिकरोडला उतरणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून, त्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला बिटकोमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकात येण्या-जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. तेथे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. स्थानकाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जात आहे. कोविड स्पेशल आणि फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू असूनही नाशिकरोडला दिवसाला पाच हजार रेल्वे प्रवासी येत आहेत. ही संख्या मोठी असल्याने प्रथम स्क्रिनिंग केले जात आहे. विशेष दिल्लीहून येणारी मंगला आणि हरिद्वार एक्स्प्रेस व उत्तर भारतातील गाड्यांमधील प्रवाशांवर प्रशासनाचे लक्ष्य आहे. प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी सर्टिफिकेट असेल तर त्यांना त्वरित जाऊ दिले जाते. सर्टि्फिकेट नसेल तर स्क्रिनिंग व अन्य चाचण्या घेतल्या जात आहे. प्रवाशांचे स्क्रीनिंग, टेस्टिंग, रिपोर्टस ही कामे पथक करेल. बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. अभय सोनवणे, स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांच्या सहकार्याने ही मोहीम पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे.