दोन महिन्यात ७० हजार रेल्वे प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:49+5:302020-12-22T04:14:49+5:30
मार्चमध्ये देशात लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेगाड्या बंद होत्या. काही महिन्यांनंतर श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. आता नेहमीच्या गाड्या बंद असल्या तरी ...
मार्चमध्ये देशात लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेगाड्या बंद होत्या. काही महिन्यांनंतर श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. आता नेहमीच्या गाड्या बंद असल्या तरी विशेष रेल्वेगाड्या सुरू आहेत. नाशिकरोड स्थानकातून सध्या दररोज ५५ ते ६० प्रवासी रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातून दोन ते अडीच हजार प्रवासी नाशिकरोड रेल्वे स्थानकात उतरतात. रेल्वेने उतरलेल्या प्रवाशांमध्ये कोणाला कोरोनाची लागण झाली असल्यास नाशिक शहरात पुन्हा कोरोनाची संख्या वाढू शकते. हा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाच्या मदतीने प्रवाशांची गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना टेस्ट सुरू केली आहे. याआधी रेल्वेतर्फे केवळ प्रवाशांच्या तापमानाची नोंद घेतली जात होती.
महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकात कोरोना टेस्टिंगसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तीन पथके असून ती तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करतात. ही पथके रेल्वेने शहरात येणा-या सर्व प्रवाशांची तापमान चाचणी घेतात. संशयित प्रवाशांची कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात येते.
चौकट==
प्रवाशांचे असहकार्य
रेल्वेने येणारे बरेचसे प्रवासी मास्क लावत नाहीत, रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, रजिस्टरमध्ये नोंदविण्यासाठी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रेल्वेस्थानकात योग्य नोंदी ठेवून शहरात कोरोनाला अटकाव करण्यात समस्या येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.