जळगावच्या धर्तीवर नाशिकमध्ये गुदाम तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:36 PM2018-02-12T14:36:51+5:302018-02-12T14:39:35+5:30
सार्वजनिक वितरणप्रणालींतर्गत रेशनमधून स्वस्त दरात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी शासकीय धान्य गुदामात धान्याची साठवणूक केली जाते. जळगाव जिल्ह्यातील एका धान्य गुदामाला आमदार खडसे यांनी
नाशिक : गेल्या महिन्यात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावात रेशन गुदामाची तपासणी करून त्यातील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर केलेल्या तक्रारीतून विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यांच्या शासकीय धान्य गुदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गुदामांची अधिका-यांकरवी कसून तपासणी केली जात आहे. रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी टाकलेले हे पाऊल असून, अशाच गुदाम तपासणीतून तीन वर्षांपूर्वी सुरगाणा धान्य घोटाळा उघडकीस आला होता हे विशेष!
सार्वजनिक वितरणप्रणालींतर्गत रेशनमधून स्वस्त दरात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी शासकीय धान्य गुदामात धान्याची साठवणूक केली जाते. जळगाव जिल्ह्यातील एका धान्य गुदामाला आमदार खडसे यांनी अचानक भेट देत तेथील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर त्याची दखल घेत अगोदर जळगाव जिल्ह्यातील सर्वच गुदामांची पर जिल्ह्यातील अधिका-यांकडून तपासणी करण्यात आली. त्यात १७ पैकी तीन गुदामांमधील धान्य साठवणुकीत गडबड उघडकीस आल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त झगडे यांनी विभागातील सर्व जिल्ह्यातील धान्य गुदामांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. उपजिल्हाधिकाºयांमार्फत गुदामांची कसून चौकशी करून त्याचा अहवाल तत्काळ विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले असून, ही तपासणी निष्पक्षपातीपणे व प्रामाणिकपणे होण्यासाठी तालुक्यातील नेमणुकीस असलेल्या प्रांत अधिका-यांना दुस-या तालुक्याची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे वास्तव उघड होण्यास मदत होईल.