बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेफर्ड ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 05:50 PM2021-01-11T17:50:08+5:302021-01-11T20:12:43+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील मिरगाव व शहा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या नर-मादीची जोडी धुमाकूळ घालत आहे. शनिवारी (दि.९) शहा-मिरगाव रस्त्यालगत मिलिंद घोडेराव यांच्या वस्तीवरील जर्मन शेफर्ड कुत्र्याला फस्त केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
घोडेराव यांच्या घरासमोरील सुमारे सात फूट उंचीवरील लोखंडी कुंपनावरून उडी घेत बिबट्याने आत प्रवेश केला. त्याबरोबर, एक मादी बिबट्याही दिसत असल्याचे शेतावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळी मिरगाव रस्त्यालगत असलेल्या शेळके वस्तीवर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्यापासून बिबट्याने आपले ठिकाण सोडले असून, शहाच्या दिशेने दोन किलोमीटर अंतर असलेल्या घोडेराव यांच्या वस्तीवर कुत्र्याला ठार केले. कुंपनावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवळपास एक तास बिबट्या वस्तीवर असल्याचे दिसून आले. मिरगाव परिसरात गुरुवारी (दि.७) रात्री आठ वाजेच्या सुमारास सुमारास संतोष बैरागी यांच्या शेतात बिबट्याची जोडी राजरोजसपणे वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पडावे लागत आहे. सायंकाळच्या सुमारास कुत्र्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने बैरागी यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. बॅटरीच्या प्रकाशझोतात शोधाशोध करीत असताना, अचानक एक बिबट्याने त्यांच्या समोरून पलायन केले, तर दुसऱ्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला त्याला फस्त केले होते.