‘त्या’ मार्गावरील मद्य दुकानांची तपासणी
By admin | Published: June 6, 2017 03:09 AM2017-06-06T03:09:08+5:302017-06-06T03:09:17+5:30
नाशिक : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातून जाणाऱ्या नाशिक-दिंडोरी व नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन राज्य मार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातून जाणाऱ्या नाशिक-दिंडोरी व नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन राज्य मार्गाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असताना या दुकानांना होत असलेला विरोध पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानांबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असलेले मद्यविक्री दुकानांचे परवाने एप्रिलपासून नूतनीकरण न करण्याचे आदेश दिल्यानंतर शहरी हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य मार्गाचे स्थानिक संस्थांकडे हस्तांतरित करून सदरची बंद झालेली दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न म्हणून नाशिक शहरातून जाणाऱ्या नाशिक-दिंडोरी या राज्य मार्गावरी १०.७५० किलोमीटर तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर या मार्गावरील ८ किलोमीटर रस्ता नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला. या दोन्ही रस्त्यांवरील ३४ मद्यविक्रीची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असताना स्थानिक रहिवाशांनी मात्र शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले.