तारवालानगर येथील मेरीच्या जागेची पाहणी
By admin | Published: January 5, 2015 01:32 AM2015-01-05T01:32:44+5:302015-01-05T01:33:27+5:30
तारवालानगर येथील मेरीच्या जागेची पाहणी
पंचवटी : साधुग्राम पाहणी दौऱ्यानंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी दिंडोरीरोडवरील पाटकिनारी असलेल्या तसेच तारवालानगर येथील मेरीच्या जागेची पाहणी करून आगामी सिंहस्थासाठी या जागेकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. तपोवनात सिंहस्थासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून दिंडोरीरोडवरील मेरीचे ३ मोकळे भूखंड दाखविण्यात आले. यावेळी ग्यानदास यांनी सदर जागा बघून समाधान तर व्यक्त केले. सदर जागेची याच सिंहस्थासाठी मागणी झाल्यास प्रशासनाला या जागेवर सुविधा द्याव्या लागतील. शिवाय साधुग्राम नसल्यास पर्वणी (शाही) स्नानाच्या दिवशी साधु-महंतांना तपोवनात न्यावे लागेल व तेथून शाही मिरवणूक काढावी लागेल, अशी अडचणही बोलून दाखविली.तलाठी कॉलनीत असलेला मोकळा भूखंड सिंहस्थासाठी योग्य आहे; मात्र या जागेवरून प्रशासनाने साधु-महंतांना नेण्याची व्यवस्था करावी, असे सांगून सदर जागेचा आगामी सिंहस्थासाठी विचार करू प्रशासनानेही लक्ष द्यावे, असे यावेळी संकेत दिले. या शिवाय जागा निश्चित केली, तर आखाडे या जागेवर यायला पाहिजे, असे सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात तपोवनातील जागा अपुरी पडल्यास दिंडोरीरोडवरील मेरीच्या जागेत साधुग्रामची उभारणी केली जाईल, असे संकेत महंत ग्यानदास महाराज यांनी दिले. (वार्ताहर)