येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:12 PM2019-12-09T18:12:33+5:302019-12-09T18:12:48+5:30
साठवणुकीवर निर्बंध : पुरवठा विभागाची कार्यवाही
येवला : कांद्याच्या वाढलेल्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार सोमवारी (दि.९) पुरवठा विभागाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ९ अडत्यांच्या दुकानांची तपासणी केली. तपासणीदरम्यान साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे कोठेही आढळून आले नाही.
सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनेउपायोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जास्त कांदा साठवून ठेवता येणार नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत. बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापा-यांकडून कांदा साठवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. सदर निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व साठेबाजीर करणा-या व्यापा-यांवर कारवाई करण्यासाठी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ९ अडत्यांच्या दुकानांची पंचासमक्ष तपासणी केली. तपासणीदरम्यान साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे कोठेही आढळून आलेले नाही. कांद्याचे साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी यापुढेही अचानक तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे येवला पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.