पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:26+5:302021-01-23T04:15:26+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील ६३ एकर जागेवर उभारण्यात येणार ...

Inspection of proposed site of Pune University Sub-Center | पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी

पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेची पाहणी

googlenewsNext

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक येथील उपकेंद्र दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील ६३ एकर जागेवर उभारण्यात येणार असून शासनाने २०१४ मध्ये त्यासाठी जमीन हस्तांतरित केली आहे; परंतु विविध प्रशासकीय अडचणींमुळे हे काम रखडले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले असून काम त्वरित होण्यासाठी सर्व प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामाच्या प्रगतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही वेळोवेळी आढावा घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी शिवनई येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन उपकेंद्राच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कामाचा आढावा घेतला. यावेळी शिवनई ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुनीता निंबाळकर व पोलीस पाटील पांडुरंग गडकरी यांनी या उपकेंद्राच्या कामास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच स्थानिकांच्या समस्यांबाबत माहिती दिली. या उपकेंद्राला जाण्यासाठी दोन किलोमीटरच्या रस्त्याचे कामासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारीवर्गाची बैठक घेण्यात येईल तसेच सर्व प्रलंबित कामांना तत्काळ मंजुरी देऊन पुणे विद्यापीठाच्या या इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उदय सामंत यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रफुल्ल पवार, उपकुलसचिव एम. व्ही. रासवे, उपकेंद्राच्या कामाचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, मंडलाधिकारी राजेंद्र विधाते, तलाठी विजय कातकडे, ग्रामसेविका उज्ज्वला भोईर आदींसह परिसरातील शेतकरीवर्ग उपस्थित होता.

Web Title: Inspection of proposed site of Pune University Sub-Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.