पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:57 PM2020-02-17T23:57:25+5:302020-02-18T00:14:16+5:30
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घालत असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.
लासलगाव : येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घालत असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.
डॉ. आरती सिंह यांनी लासलगाव बसस्थानकात ज्याठिकाणी घटना घडली तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी निफाडचे पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डी व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे त्यांचे समवेत होते.आरती सिंह यांनी आतापर्यंत झालेल्या तपास कार्याचा आढावा घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर लासलगाव पोलिस स्थानकात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, पीडितेच्या पहिल्य पतीचे निधन झाले आहे आणि पहिल्या पतीपासून तिला तीन लहान मुले आहेत. पीडितेची प्रकृती तंदुरुस्त होण्यासाठी बराच काळ जाणार आहे. त्यामुळे मनोधैर्य योजनेतून काही आर्थिक मदत करता येईल काय, या विषयी नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या गुन्ह्याचा पोलिस तपास व्यवस्थित सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
लासलगाव येथे पोलीस संख्या वाढविली पाहिजे याकरिता आपण जातीने लक्ष घालू तसेच बसस्थानकावर मुलींच्या सुरक्षेबाबत पोलीस लक्ष घालतील. त्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान नेमले जातील. लासलगाव ही मोठी कांदा बाजारपेठ आहे. कांदा आवक वाढल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त तात्पुरते पोलीस देण्याकरिता आपण लक्ष घालू, असेही आरती सिंह यांनी सांगितले.