इगतपुरी, त्र्यंबकमधील गावांची प्रशासनाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:12 PM2020-03-29T16:12:42+5:302020-03-29T16:13:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
वैतरणानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असुन इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन्हीही तालुक्यातील महसुल शाखेच्या वतीने ग्रामस्थांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या दोन तालुक्यातील वैतरणा, देवगाव, डहाळेवाडी, पहिने आदी परिसरातील गावांची पाहणी केली. या भागातील ग्रामस्थांना योग्य खबरदारी घेण्यासोबतच घराबाहेर पडू नका, पडलेच तर वेळोवेळी हात धुवा, प्रशासनाला सहाय्य करा या सुचना यावेळी करण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तुंच्या साठेखोर दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही चव्हाण व गिरासे यांनी सांगितले. यावेळी गावांची पाहणी करत प्रशासनालाही योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दिपक गिरासे, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.