मठाधिपतींचे वाहन जाळले
By admin | Published: January 30, 2015 12:51 AM2015-01-30T00:51:58+5:302015-01-30T00:52:21+5:30
भाविकांमध्ये नाराजी : सीसीटीव्ही फुटेजची होणार तपासणी
विंचुरे : बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र कपालेश्वर येथील मठाधिपती पोपटनाना महाराज यांचे चारचाकी वाहन अज्ञात संशयितांनी मंगळवारी रात्री पेटवून दिल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करत संशयितांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सीसीटीव्हीचे फुटेज पुणे येथे पाठविण्यात आले आहे.
पोपटनाना हे गेल्या पस्तीस वर्षांपासून महादेव मंदिरात कीर्तनकार म्हणून आहेत. काही शिष्यांनी त्यांना इंडिका कार भेट म्हणून दिली होती. कालांतराने नानांनी कार (एमएच ४१-व्ही-८३६७) खरेदी केली. ते कीर्तनाला बाहेरगावी गेले असता अज्ञातांनी त्यांच्या खोलीची पाठीमागील खिडकी तोडून त्यांनी जमवलेले सुमारे अडीच लाख रुपये चोरून नेले. त्यानंतर त्यांची कार पेटवून देण्यात आली. याबाबत महाराजांनी किकवारी येथील केदा बापू काकुळते यांना दूरध्वनीहून माहिती दिल्यानतंर ते घटनास्थळी दाखल झाले.
सकाळी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. यावेळी कौतिकभाऊ, कडूनाना, केदाबापू, आप्पा कोर तसेच आजूबाजूच्या गावांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)