पोलीस निरीक्षकाचा महासंचालक पदकाने सन्मान; पाचच दिवसांत कंट्रोलला बदली, झाला गुन्हा दाखल
By अझहर शेख | Published: May 6, 2023 06:22 PM2023-05-06T18:22:19+5:302023-05-06T18:23:06+5:30
माईनकर यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील उपनगर पोलिस ठाण्याचे तात्कालीन वरिष्ठ पोलिस निरिक्षक नीलेश माईनकर यांचा महाराष्ट्रदिनी पोलिस महासंचालक पदक देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर तडकाफडकी गुरूवारी त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आणि शुक्रवारी (दि.६) न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापुर पोलिस ठाण्यात संशयित माईनकर यांच्यावर आपल्या पदाचा दुरूपयोग करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळविणारे माईनकर हे अडचणीत सापडले आहे. त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. २०१६सालच्या एका फसवणूक प्रकरणात महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-२कडे होता व या युनिटचा प्रभारी पदभार तेव्हा माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी फिर्यादी महिलेकडे वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा फिर्यादीने न्यायालयात केला. न्यायालयाने गंगापुर पोलिसांना आदेशित करत माईनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला. यानंतर गंगापुर पोलिस ठाण्यात त्यंच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माईनकर यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांचा प्रभारी पदभार आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक शरमाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माईनकर यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे.