दृष्टिदानाच्या संकल्पासह समाजाला प्रेरित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:10 AM2021-06-11T04:10:43+5:302021-06-11T04:10:43+5:30
नाशिक : नेत्रदानास महादान असे संबोधण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांअभावी या जगाचे सौंदर्य दिसले नाही, तर या ...
नाशिक : नेत्रदानास महादान असे संबोधण्यात येते. जर एखाद्या व्यक्तीला डोळ्यांअभावी या जगाचे सौंदर्य दिसले नाही, तर या पृथ्वीवरील त्याचा जन्म अपूर्णच मानला जातो. त्यामुळे सुजाण नागरिकांनी दृष्टिदानाच्या संकल्पासह समाजाला नेत्रदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन नाशिकच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचे (नॅब) अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले आहे.
जागतिक दृष्टी दिनाच्या पार्श्वभूमीवर नेत्रदानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यास लोकांना प्रेरित करणे, हे या दिनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मृत्यूपश्चात अन्य नेत्रबाधितांना हे जग बघता यावे यासाठी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदानाचा संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केेले. नेत्रदान प्रक्रियेमध्ये एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे नेत्रदानाची वैद्यकीय प्रक्रिया मृत्यूच्या ६ ते ८ तासांच्या आत करणे आवश्यक असते. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुःखाच्या आवेगात असलेल्या कुटुंबाला वेळेचे भान ठेवून ही प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूमध्ये नेत्रदान कमी अपेक्षित आहे; परंतु वार्धक्यामुळे आणि दीर्घ आजारामुळे मृत्यूची कल्पना असल्यास कटाक्षाने नेत्रदानाचा विचार झालाच पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. मोतीबिंदू किंवा डोळ्याच्या इतर ऑपरेशनद्वारे ग्रस्त रुग्ण नेत्रदान करू शकतात, तसेच चष्मा, मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब आणि श्वास, हृदयविकार, क्षयरोग इत्यादी शारीरिक विकार असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकत असल्याचे कलंत्री यांनी नमूद केले. इच्छुक व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी नॅब तत्पर असून, अधिक माहितीसाठी सातपूरच्या नॅब कार्यालयात किंवा २३६४३७८ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
नॅबच्या सेवेची ३७ वर्षे नॅब ही संस्था नाशिकमध्ये गेली ३७ वर्षे सातत्याने दृष्टिबाधित बांधवांच्या आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि सर्वांगीण विकास यासाठी कार्यरत आहे. २ विद्यार्थिनींपासून १९८८ मध्ये सुरू झालेल्या नॅबच्या शाळेत आता ७० दृष्टिबाधित विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. नॅबच्या रोजगार प्रशिक्षण केंद्रात दृष्टिबाधित बांधव रोजगाराचे प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-----------
फोटो
कलंत्री (हार्ड कॉपी)