शहरात तीन महिन्यात वाटर मीटर बसवा; जलसंपदा मंत्र्यांचे महापालिकेला आदेश
By Suyog.joshi | Updated: February 15, 2025 15:04 IST2025-02-15T15:03:50+5:302025-02-15T15:04:42+5:30
बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.

शहरात तीन महिन्यात वाटर मीटर बसवा; जलसंपदा मंत्र्यांचे महापालिकेला आदेश
नाशिक (सुयोग जोशी) : शहरात असमतोल पाणी वाटप होत आहे. मलनिसारण केंद्रातून नदीपात्रात ६५ टक्के पाणी प्रक्रिया करून सोडणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ते होत नसल्याचा ठपका ठेवत सध्या पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. सर्व भागात सारखे पाणीवाटप होणे गरजेचे असून त्यासाठी येत्या तीन महिन्यात शहराच्या प्रत्येक भागात वॉटर मीटर बसवून शासनाला अहवाल सादर करावा असे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दिले. बैठकीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सराेज अहिरे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, मनपाचे अधिकारी, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विखे म्हणाले, - पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वच महापालिका, नगर पालिकेसाठी आढावा बैठक घेण्याचे काम सुरू आहे. बिगर सिंचनाचे आरक्षण वाढत चालले आहे. नाशिक महापालिकेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्याचीही माहिती घेतली जात आहे. नाशिकचे पाणी मराठवाड्याला पळविले जात असल्याबद्दल विखे म्हणाले, याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही चर्चा नाही.उलट दिलेले पाणी मनपाने वापरावे. त्यातील ६५ टक्के पाणी नदीत आम्हाला द्यावे. मंजूर पाण्याची कपात केली जाणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छ हवी
आगामी कुंभमेळ्याच्या पाश्व'भूमीवर गोदावरी स्वच्छ ठेवणे, प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येकाचाच सहभाग महत्वाचा आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाकडे जास्तीत जास्त निधी मागावा, त्याच निधीतून पाण्यासाठी अधिक निधी कसा वापरता येईल याचे नियोजन पाटबंधारे खाते व महापालिकेने एकत्रितरित्या करावे असे आवाहनही विखे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केले.