आज श्रींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:10 PM2020-08-21T23:10:39+5:302020-08-22T01:18:18+5:30
मालेगाव : गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दहा दिवस श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शुक्रवारी शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मालेगाव : गणेश चतुर्थीनिमित्त पुढील दहा दिवस श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना केली जाणार आहे. शुक्रवारी शहरात चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
सकाळपासूनच भाविकांनी शहरातील सटाणा नाका, जुना आग्रारोड, कॅम्प, रावळगाव नाका परिसरात मूर्तींचे, सजावटीचे व पूजा साहित्याचे स्टॉल लागले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व महापालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरू केली होती. शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला बंदी घातली आहे. शहरात शुक्रवारी १२५ प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मर्यादा येणार असल्या तरी गणेशभक्तांमध्ये उत्साह दिसून आला. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ३०० मोठे व शंभरापेक्षा अधिक लहान गणेश मंडळ श्रींची स्थापना करतात. मात्र यंदा ग्रामीण भागातही कोरोनाने डोके वर काढले आहे. असे असले तरी एक गाव एक गणपती बहुतांशी ठिकाणी स्थापन केला जाणार आहे. पोलीस व मनपा प्रशासनानेही गणेशोत्सवाची तयारी केली आहे. पोलिसांनी शहरातील ६७ मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. तर नऊ व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. यंदा बाहेरगावाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली नाही. स्थानिक पोलीस यंत्रणेकडून गणेशोत्सव काळात बंदोबस्त ठेवला जाणार आहे.