मुलांना धन-दौलतीऐवजी संस्कारांचा वारसा द्या...
By Admin | Published: May 23, 2016 10:55 PM2016-05-23T22:55:18+5:302016-05-24T00:44:53+5:30
खासदार विजय दर्डा : वसंत व्याख्यानमालेत भावनिक आवाहन
नाशिक : तुमच्या मुलांना शाळेत जरूर पाठवा; पण ‘घरातली शाळा’ बंद करू नका. कारण आई-वडील हे मुलांसाठी विद्यापीठ असते. मुलांना धनदौलत, मालमत्ता, इस्टेट वगैरे काही दिले नाही तरी चालेल; पण त्यांना संस्कारांचा वारसा मात्र आवर्जून द्या. कारण तीच जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, असे भावनिक आवाहन खासदार तथा ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.
नाशिक वसंत व्याख्यानमालेचे बाविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपल्या शांत पण ओघवत्या शैलीतील वक्तृत्वातून त्यांनी उपस्थितांना स्वत्त्वाची जाणीव करून दिली. गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर मूळचंदभाई गोठी यांच्या स्मरणार्थ झालेल्या या व्याख्यानात त्यांनी ‘मैं कौन हूॅँ, मैं क्या हूॅँ’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या आयुष्यातील अनुभवांपासून भाषणाला प्रारंभ केल्यानंतर दर्डा यांनी या विषयाला व्यापक स्तरावर नेऊन ठेवले. ते म्हणाले, आपण कोण आहोत आणि या जगात का आलो आहोत, याचा तुम्ही कधी विचार केला? मी या जगात आलो की आणला गेलो? जर आणला गेलो असेल तर त्यामागे काही निश्चित उद्देश असेल. हा उद्देश शोधण्याची गरज आहे. तुम्ही डोळे बंद करून स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहा आणि स्वत:ला प्रश्न विचारा. तेव्हा तुम्हाला अनेकविध भावना, माणसे, घटना जाणवतील; पण तुम्ही स्वत:साठी किती जगलात, की आयुष्यभर दुसऱ्यासाठीच वेळ दिला, याचीही जाणीव होईल.
माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांनी आम्हा भावंडांचे अत्यंत वेगळ्या रीतीने पालनपोषण केले. त्यांनी आम्हाला ठरवून महापालिकेच्या शाळेत घातले. तिथल्या शिक्षकांच्या कपड्यांवर ठिगळे लावलेली असायची; पण त्यांच्यातल्या आत्मविश्वासाने आम्हाला संस्कार दिले. आज आपल्याकडे सारे काही आहे, फक्त संस्कार नाहीत. ते असते तर वृद्धाश्रम नसते, भावा-भावात भांडणे झाली नसती. पहिलीपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत आम्हाला कार वापरण्याची परवानगी नव्हती. बसने प्रवास करीत असू, अशा आठवणींना उजाळा देत दर्डा यांनी अनेक किस्से, प्रसंग सांगत संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
ते म्हणाले, माणसांना जाणून घेण्याची माणसे हीच जगातील सर्वोत्तम प्रयोगशाळा आहे. मागे आम्ही जैन साध्वी प्रीतिसुधाजी म. सा. यांची प्रवचनमाला घेतली, तेव्हा त्यासाठी आई, भाऊ, बहीण, पती-पत्नीतील नाते असे साधे-सोपे विषय ठेवले. आम्ही दहा हजार लोक बसतील एवढा मंडप उभारला, तेव्हा प्रीतिसुधाजींनी ‘एवढी माणसे येतील का’ असे विचारले.
त्यावर आम्ही त्यांना सांगितले की, ‘विचार येतील.’ अन् खरोखरच त्यांचे विचार लोकांना एवढे भावले की, अनेकांनी आपण आपल्या भाऊ, बहीण, सासूशी वाईट वागल्याची स्वत:हून कबुली दिली.
एवढेच नव्हे, भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हेसुद्धा खास प्रवचन ऐकण्यासाठी आले. संवेदना, संस्कारांत ही शक्ती असते. आपण मंदिरांत जातो आणि देवाकडे काही ना काही मागत बसतो. लोक दगडाला शेंदूर लावून त्याचा
देव करून टाकतात; पण
माता-पित्याच्या रूपाने आपल्या घरात देव बसले आहेत, हे
आपण विसरून जातो. आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवून स्वत:च्या मुलाकडून आपल्याला सांभाळण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. ही सगळी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘मैं बनूंगा तुम कभी,
तुम मैं कहलाओगे...
जब जब भी मॉँ की याद आएगी
तब तब मैं प्रेम की भावना बन जाऊंगा...’
या कवितेने दर्डा यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पुष्पादीदी, अविनाश गोठी यांच्यासह व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय हाके, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मधुकर झेंडे, अरुण शेंदुर्णीकर उपस्थित होते. संगीता बाफना यांनी मूळचंदभाई गोठी यांना आदरांजली अर्पण केली. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी दर्डा यांचा परिचय करून दिला. हिरालाल परदेशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)