उपाययोजनांऐवजी केवळ जागृतीवरच भिस्त
By admin | Published: August 20, 2016 12:44 AM2016-08-20T00:44:59+5:302016-08-20T00:49:52+5:30
निष्क्रिय आरोग्य विभाग : खासगी रुग्णालयांना परस्पर डेंग्यूचा संशयित जाहीर करण्यास मनाई
नाशिक : डेंग्यूच्या आजाराची लागण एडिस एजिप्ताय जातीच्या डासांच्या चाव्यामुळे होते आणि सदर डासांच्या अळींची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यातच होत असल्याने महापालिकेकडून नागरिकांच्या जागृतीवर भर दिला जात असला तरी त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग निष्क्रिय ठरला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचारीवर्ग नाही आणि पुरेशी साधनसामग्रीही उपलब्ध नाही. आरोग्याशी निगडित पेस्ट कंट्रोल, घंटागाडी, खतप्रकल्प या सेवा खासगी ठेकेदारांच्या हाती द्याव्यात की त्या मनपानेच स्वत: चालवाव्यात याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात मतभेद आहेत. मात्र, या वादात नाशिककरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
गेल्या चार वर्षांपासून शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. दरवर्षी हजाराहून अधिक संशयित रुग्णांची नोंद महापालिकेच्या दप्तरी केली जात असली तरी प्रत्यक्ष खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. डेंग्यूच्या वाढत्या आजाराबाबत मनपाचा आरोग्य व वैद्यकीय विभाग तऱ्हेवाईक कारणे देत आला आहे. कधी तपमानात बदल झाल्याचे सांगितले जाते, कधी फवारणीचे कारण दिले जाते. महापालिकेने आॅक्टोबर २०१५ पासून गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे पाणीकपात सुरू केली होती. या पाणीकपातीचाही संबंध आरोग्य विभागाने डेंग्यूशी जोडून दिला. लोक पाण्याची साठवण करत असल्याने स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या अळ्या होतात, असा युक्तिवाद केला गेला. तर लोकांनीच आपले आरोग्य सांभाळण्याची गरज आहे, असा पवित्राही मध्यंतरी आरोग्याधिकाऱ्याने घेतला होता. शहरात डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाने मध्यंतरी सर्व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना मनपात पाचारण करत त्यांना परस्पर डेंग्यूचा संशयित रुग्ण जाहीर करण्यास मनाई केली होती. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचे निदान करण्यापूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधण्याचे आदेशही देण्यात आले होते. खासगी रुग्णालयांकडूनच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या फुगवून सांगितली जात असल्याचा आरोप आरोग्य विभागाने केला होता. परंतु शहरात महापालिकेच्या रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्येच तत्पर सेवा मिळत असल्याने लोक त्याठिकाणी भरती होत असतात. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे कक्ष स्थापन करण्यात आले, परंतु तेथील अपुऱ्या सुविधा व उपचाराबाबत नसलेली विश्वासार्हता यामुळे सदर कक्ष रिकामे असतात. डेंग्यूच्या आजाराबाबत लोकजागृती होणे आवश्यकच आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माध्यमांद्वारे आवाहन केले जाते. परंतु केवळ जागृतीवरच भिस्त ठेवणाऱ्या आरोग्य विभागाकडून त्या तुलनेत उपाययोजना मात्र होताना दिसून येत नाही. महापालिकेकडे नॅपसॅक पंप, हॅण्ड फॉगिंग मशीन तसेच व्हेईकल फॉगिंग मशीन आदि साधनसामग्री अपुरी आहे. त्यातील बरीचशी यंत्रणा बंद स्थितीत आहे. सिंहस्थ काळातही डेंग्यूचा धोका वाढू नये यासाठी काही साधनसामग्री खरेदीचा प्रस्ताव होता, परंतु त्याबाबतही ठोस माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात नाही. अनेकदा धूर व औषध फवारणीसाठी काही नगरसेवकांनी स्वत: फॉगिंग मशीन खरेदी करत आपापल्या प्रभागांमध्ये व्यवस्था केली होती. परंतु जे काम महापालिकेने करावयास हवे ते लोकप्रतिनिधींना स्वखर्चाने करावे लागले.
डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेत यापुढे स्वतंत्र कक्ष नेमून स्वतंत्र अधिकाऱ्याकडे त्याबाबतचा कार्यभार सोपविण्याची गरज आहे. पेस्ट कंट्रोलच्या कामावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. माजी आयुक्त गेडाम यांनी पेस्ट कंट्रोलमधील स्वाक्षरी घोटाळा बाहेर काढला होता. लोकांच्या कशा बनावट स्वाक्षऱ्या करून फवारणी केल्याचे भासविले जात होते. त्याबाबत गेडाम यांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याचेही संकेत दिले होते, परंतु नंतर त्याविषयी काहीही कार्यवाही झालेली नाही. सदर ठेकेदारालाच गेडाम यांच्याच कारकीर्दीत घंटागाडीचा ठेका देण्यात आला आहे. आरोग्य विभागाशी निगडित सेवा या महापालिकेनेच स्वत: चालवाव्यात याबाबत सदस्यांकडून वारंवार महासभेत आवाज उठविला जात असतो. परंतु प्रशासन मात्र ठेकेदारांच्या माध्यमातूनच या सेवा चालविण्याला प्राधान्यक्रम देत आले आहे. त्यापाठीमागील गौडबंगाल सर्वज्ञात आहे. भविष्यात शहराला डेंग्यूचा विळखा पडू नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आणि लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील मुखंडांच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
(समाप्त)