तरण तलावाऐवजी गंगापूररोडला क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:18 AM2018-10-14T00:18:10+5:302018-10-14T00:18:36+5:30
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ विशेष आमदार निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी तरण तलाव होणार नसून त्याऐवजी क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आमदार देवयानी फरांदे यांना मोठा धक्का दिला आहे.
गंगापूररोड : गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ विशेष आमदार निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी तरण तलाव होणार नसून त्याऐवजी क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आमदार देवयानी फरांदे यांना मोठा धक्का दिला
आहे. याशिवाय याठिकाणी महापालिकेसाठी आरक्षित भूखंडावर भाजीमंडई बांधत नाही तोपर्यंत विकासकामे त्याच्या संकुलाचे
सुरू केलेले बांधकामदेखील थांबविण्यासाठी साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाअंतर्गत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकाशवाणी केंद्राजवळ शनिवारी (दि.१३) नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार फरांदे यांच्या तरण तलावाच्या विषयाला फाटा दिला. राज्य सरकारने शहरी भागातील आमदारांना विशेष निधी दिला असून, त्याअंतर्गत आकाशवाणी केंद्राजवळील महापालिकेच्या राखीव भूखंडावर जागेत जलतरण तलाव साकारण्यासाठी आमदार फरांदे यांनी महापालिका
आयुक्त तुकाराम मुंढे यांना सांगितले होते.
मात्र त्यांनी त्यावेळी विरोध दर्शवून सर्व निधी शहरात जलवाहिन्यांसाठी वापरण्याचे जाहीर केल्यानंतर फरांदे यांंनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून तरण तलाव बांधण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.
मात्र आता याठिकाणी क्रीडासंकुल विकसित होणार आहे. आकाशवाणी केंद्राजवळील सुमारे पाच ते सहा एकर क्षेत्राचा आरक्षित प्लॉट आरक्षित करण्यात आला आहे. ती जागा येत्या दोन ते तीन महिन्यांत ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण केली जाणार असून, तेथे अद्ययावत स्पोर्ट ग्राउंड व स्पोर्ट क्लब विकसित करणार असल्याचे सांगून या ठिकाणी तरण तलाव होणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
आधी मंडई, मग खासगी काम
आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या प्रश्नावर उत्तर देताना एआर अंतर्गत (मूळमालकांकडून आरक्षित जागेचा विकास) ही जागा विकसित होत असून, जोपर्यंत बिल्डर भाजीबाजारासाठी ठरवून दिलेली जागा बांधून महापालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत बिल्डरला संबंधित जागेवर इतर काम करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरने इतर जागेत सुरू केलेले काम तत्काळ थांबविण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच भाजीबाजारातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी एआर अंतर्गत जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.